Beed News: "मी एकटा पडलो..", मित्रांनी बर्थडे पार्टीला बोलावले नाही; बीडमध्ये २४ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन!
बीड (अंबाजोगाई): मैत्रीत आलेला दुरावा आणि एकटेपणाच्या भावनेतून एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले नाही, या कारणावरून नैराश्यात आलेल्या महेश उद्भव (वय २४) या तरुणाने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि त्याच्या मित्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी (६ एप्रिल) त्यांच्या एका खास मित्राचा वाढदिवस होता. महेश नेहमीच मित्रांच्या सुख-दुःखात आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये आघाडीवर असायचा. मात्र, वादाचे कारण पुढे करत यावर्षी मित्रांनी त्याला वाढदिवसाच्या पार्टीचे निमंत्रण दिले नाही.
मित्रांनी आपल्याला सोडून आनंद साजरा केला, ही गोष्ट महेशच्या मनाला लागली. याच मानसिक दडपणातून त्याने मंगळवारी दुपारी राहत्या घराच्या छतावर जाऊन विषारी औषध प्राशन केले.
मोबाईल स्टेटस ठरले अखेरचे शब्द
आत्महत्या करण्यापूर्वी महेशने आपल्या मोबाईलवर एक भावनिक स्टेटस ठेवले होते. "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो..." अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली होती. हे स्टेटस पाहून त्याचे कुटुंबीय आणि मित्र हादरून गेले आहेत.
घटनेचा घटनाक्रम:
- मंगळवार दुपार: महेश घराच्या छतावर एकटाच झोपायला गेला.
- विष प्राशन: पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून त्याने प्यायले.
- रात्री ८ वाजेच्या सुमारास: बराच वेळ खाली न आल्याने कुटुंबीय छतावर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला.
- उपचार: त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वडिलांनी शेती विकून स्वप्न पूर्ण केले होते...
महेशच्या वडिलांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची शेती विकली होती. त्या पैशातून त्यांनी अंबाजोगाई शहरात महेशला कपड्याचे दुकान टाकून दिले होते. ऐन उमेदीच्या वयात मुलाने अशा प्रकारे जीव दिल्याने कुंबेफळ गावावर शोककळा पसरली आहे. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाची टीप (Help is Available):
आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी आत्महत्येचा विचार करणे चुकीचे आहे. नैराश्य किंवा मानसिक त्रासातून जात असाल, तर कृपया जवळच्या व्यक्तीशी बोला किंवा तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.


thanks for comment.