Nagpur News: नागपुरात हायअलर्ट! RSS मुख्यालय आणि राम मंदिराजवळ जिवंत स्फोटकांचा साठा, परिसरात मोठी खळबळ
नेमकी घटना काय?
गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोसर भवन चौक, जो मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ आहे, तिथे एका घराच्या परिसरात एक संशयास्पद बॅग आढळून आली. ही बॅग गेल्या एक-दीड महिन्यांपासून तिथेच पडून होती. मात्र, आज सकाळी बॅगमधून काही वस्तू बाहेर दिसू लागल्याने घरमालकाने तपास केला असता त्यात स्फोटके असल्याचे लक्षात आले.
सापडलेल्या स्फोटकांचा तपशील:
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या बॅगेत खालील घातक साहित्य सापडले आहे:
- १५ जिलेटीन कांड्या (Gelatin Sticks)
- ५८ डिटोनेटर (Detonators)
- ८ कनेक्टर (Connectors)
RSS मुख्यालय आणि मंदिरे निशाण्यावर?
ज्या ठिकाणी ही स्फोटके सापडली, तो परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. घटनास्थळापासून:
- जामा मशिद: अवघ्या २०० मीटरवर.
- पोद्दारेश्वर राम मंदिर: ५०० मीटर अंतरावर.
- RSS मुख्यालय: साधारण १.५ ते २ किलोमीटर अंतरावर.
एवढ्या संवेदनशील परिसरात दीड महिन्यापासून स्फोटके पडून असणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) घटनास्थळी धाव घेत हे सर्व साहित्य सुरक्षितपणे जप्त केले आहे.
काटोल स्फोटाशी कनेक्शन?
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील SBL कंपनीत काही काळापूर्वी झालेल्या स्फोटाशी या साहित्याचा संबंध असू शकतो. तेथील स्फोटक साहित्य कुणीतरी बेवारसपणे इथे आणून टाकले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
"आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. हे स्फोटक साहित्य इथे कोणी आणले आणि त्यामागे काय उद्देश होता, याचा सखोल तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे."
— राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर.
नागरिकांसाठी आवाहन
नागपूर पोलिसांनी शहरातील जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमचे चॅनेल फॉलो करा.


thanks for comment.