चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये राडा! शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल; सभापतींनाही दिली दमदाटी
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (७ एप्रिल) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास नागद रोडवरील कांदा मार्केटमध्ये लिलाव आणि व्यवहार सुरू होते. यावेळी संशयित आरोपी वाजीद खान साबीर खान, समीर वकील, सोहेल आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर ४ ते ५ पुरुष व ५ ते ६ महिलांनी विनाकारण गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
हे आरोपी मार्केटमधील कर्मचाऱ्यांना आणि कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. यामुळे मार्केटमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मध्यस्थीसाठी गेलेल्या सभापतींनाही जुमानले नाही
मार्केटमध्ये राडा होत असल्याची माहिती मिळताच बाजार समितीचे सभापती प्रदीप सुभाष पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधितांना समजवण्याचा आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित आरोपींनी सभापती प्रदीप पाटील यांच्याशीही अत्यंत उद्धट वर्तन करून त्यांना दमदाटी केली.
आरोपींनी काही महिलांना बोलावून तिथे मोठा आरडाओरडा केला आणि बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केला.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी सभापती प्रदीप पाटील (वय ४२, रा. तोंदे दिगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महत्त्वाची बातमी: बाजार समिती आवारात शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.


thanks for comment.